नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 12 सप्टेंबर 2023 रोजी स.11 वाजता महाविद्यालयाच्या स्वा.सावरकर सभागृहात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ नियमाच्या निर्देशानुसार रॅली व विद्यापीठ गीताने झाली. प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील हे होते. ते मार्गदर्शन करताना म्हणाली की, मानवास जीवन उपयुक्त कौशल्याची आज गरज आहे. महाविद्यालयीन जीवनात व्यक्तीच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञानरुपी शिदोरी मिळत असते. ती मला नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने दिली. त्यामुळे आत्मनिर्भर भारताची संकल्पना घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करता आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात अतिशय सजगतेने विविध कौशल्य आत्मसात करावीत.
या वेळी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पांडे यांनी विद्यार्थ्यांना गुरु शिष्य नात्याचे महत्त्व पटवून दिले. तर अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर म्हणाले की, समाजात महाविद्यालयाची प्रतिमा त्याचा विद्यार्थी असतो. महाविद्यालयाचा विद्यार्थी समाजात विविध पदावर सक्षमपणे काम करत आहे, याचे समाधान वाटते. आज पदवी घेतलेलले विद्यार्थी हीच वैभवशाली परंपरा कायम ठेवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.विजय तरोडे यांनी केले.याप्रसंगी ॲड. वनिता जोशी(संस्था सचिवा),कैलासचंद्रजी काला (कोषाध्यक्ष), महाविद्यालयाच्या विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, एनसीसी व एन एस एस विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती. या समारंभात कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे डॉ.संदीप काळे यांनी केले तर आभार डॉ.अतिष राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व परीक्षा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.