तात्याराव लहानेंवर गंभीर आरोप; जे. जे. मधील त्रिसदस्यीय समितीनं प्राथमिक रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
मुंबई, 17 जून, प्रणाली कापसे : ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर जे. जे. रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लहाने यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पडताळणीसाठी रुग्णालय प्रशासनानं अधिक्षक डॉ. संजय सुरासेंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीकडून रुग्णालय प्रशासनाला प्राथमिक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी 698 शस्त्रक्रिया या विनापरवानगी केल्याचा ठपका जे.जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीनं ठेवला आहे.
प्राथमिक रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी 689 शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका या समितीकडून ठेवण्यात आला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2022 या कालावधीत कोणत्याही पदावर नसताना डॉ. लहाने यांनी जेजे रुग्णालयात विनापरवानगी डोळ्यांच्या शस्रक्रिया केल्याचा आरोप या त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालकपदावरुन निवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारनं अंधत्व निवारण मोहिमेच्या समन्वयकपदी निवड करण्यापूर्वी या शस्रक्रिया केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे. नेत्ररोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना देखील रुग्णालय प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
लहाने यांची प्रतिक्रिया
दरम्यान या सर्व प्रकरणावर आता डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही शस्रक्रिया विनापरवानगी करण्यात आलेली नाही. मी परवानगी घेऊनच काम सुरु केले होते. त्रिसदस्यीय समितीनं आमची बाजू जाणूनच घेतली नाही. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून हा एकतर्फी अहवाल सादर करण्यात आला असल्याचं लहाने यांनी म्हटलं आहे.