हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी:विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक, 3.52 लाखांच्या 9 दुचाकी जप्त
हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड, अहमदनगर, नांदेड, हिंगोली जिल्हयातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना सोमवारी (ता. १२) अटक केली आहे. त्यांच्याकडून ३.५२ लाख रुपयांच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आणखी दुचाकीचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक स्थापन केले होते. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार शेख बाबर, पांडूरंग राठोड, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे याच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
यापथकाने आज सचिन विष्णू भोईनर (रा.वसमत), सुदर्शन गणेशराव कावळे (रा. नहाद, ता. वसमत), ओमकार देविदास नरवाडे, विशाल मुंजाजी देवरे (रा. थोरावा ता. वसमत) यांना अटक केली. त्यांच्या कडून ३.५२ लाख रुपये किंमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांनी बीड, अहमदनगर, नांदेड, हिंगोली या भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकींचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या चौघांनाही पोलिसांनी हट्टा पोलिसांच्या हवाली केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बाेराटे पुढील तपास करीत आहेत.