हिमायतनगरच्या बोरगाडी तांडा -२ येथील शेतकऱ्याने घेतला कर्जबाजारीला कंटाळुन गळफास
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे बोरगडी तांडा नं -२ येथील एका ४२ वर्षीय युवा शेतकऱ्याने खाजगी फायनान्स व बैंकेच्या कर्जाच्या चिंतेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना दि.०५ च्या रात्रीला १० वाजता घडली असून, दि.०६ रोजी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रोहीदास उत्तम राठोड वय ४२ वर्ष असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे बोरगडी तांडा नं -२ येथील मयत शेतकरी रोहीदास उत्तम राठोड वय ४२ वर्ष यांच्या नावे धानोरा शिवारात गट नंबर ४९ मध्ये ५ एकर शेती आहे. त्यांच्या शेतीत नेहमी नाल्याच्या व नदीच्या पुराचे पाणी येत असल्याने नापिकी होते. त्यामुळे त्यांनी मागल्या वर्षी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज घेऊन शेती केली. मात्र पावसामुळे पहिल्या पेरणीचे मुकं झाल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी खाजगी भारत फायनस कंपनीकडून कर्ज घेतले. मात्र शेतीने साथ दिली नसल्याने या दोन्हीचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होता.
त्यातच बैंकांचे कर्ज भरण्यासाठीचा तगादा यामुळे तो नेहमी चिंतेत होता. याचाच चिंतेने ग्रस्त असताना घरातील सगळी मंडळी झोपल्यानंतर रात्री १० वाजता रोहीदास उत्तम राठोड या शेतकऱ्याने घरातील नाटीला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा श्रीधर रोहीदास राठोड वय १७ वर्ष आणि श्रीनिवास रोहीदास राठोड वय १४ वर्ष अशी दोन मुले आहेत. युवा शेतकऱ्याच्या सोडून जाण्याने कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शासनाने तात्काळ मदतीचा हाथ द्यावा अशी मागणी युवा सेनेचे विशालभाऊ राठोड, दिलीप राठोड, श्याम राठोड, आदींसह समाज बांधव व शेतकरी वर्गातून केली जात आहे.