नांदेड मुंबई वंदे भारत अति जलद रेल्वे लवकरच सुरू होणार : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नववर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना नांदेडकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब समोर आली आहे. मुंबई -नांदेड या रेल्वे मार्गावर लवकरच वंदे मातरम ही अति जलद रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच आघाड्यांवर विकास सुसाटपणे सुरू आहे . राष्ट्रीय महामार्गाचे जाळे देशभर विणले जात असताना रेल्वे मार्गही सक्षम करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. देशभरातील अनेक भागात रेल्वेचे नवे जाळे विणले जात आहे. वंदे भारत ही अत्यंत जलद वेगवान रेल्वे गाडीही देशवासीयांना सुलभ आणि सुकर प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वंदे भारत रेल्वेचा लाभ मराठवाड्यातील आणि नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना व्हावा यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता . आता ह्या पाठपुराव्याला लवकरच यश येणार आहे.
मुंबई – नांदेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत ही रेल्वे मुंबई- नांदेड धावणार आहे. यासाठी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विशेष परिश्रम लाभल्याचेही खा. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे मराठवाड्याचे आणि नांदेडच्या विकासाला नवी गती मिळणार असून नांदेडकरांसाठी वंदे भारत एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.