पठ्ठ्या परिक्षेला आला, कॉपीचा पॅटर्न पाहून सगळेच चक्रावले, नाशिक पोलिसांकडून अटक
30 मे, नाशिक : मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या कथेत ज्याप्रकारे कॉपी करण्याचे प्रकार दाखविला होता तसाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. छत्रपती संभाजीनागरच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी नाशिकमध्ये रविवारी घेतलेल्या परीक्षेचा पेपर नाशिकच्या केंद्रावर फुटल्याची घटना घडली.
बटन कॅमेरा आणि ब्लूटूथ या तंत्रज्ञानाच्या साह्याने हा गैरप्रकार केल्याचा संशय परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. परीक्षा देणारा मूळ उमेदवार, त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या डमी परीक्षार्थी आणि उत्तर पुरवणारा अशा तीन संशयिताविरोधात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टेक सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा सुरू होती.
अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहुल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली, त्याने बटन कॅमेरा आणि ब्लूटूथ च्या साह्याने प्रश्नपत्रिका फोटो बाहेर पाठवला आणि केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अर्जुन राजपूत याने प्रश्नांची माहिती दिली, त्यामुळे पोलिसांनी राजपूत आणि नागलोथ याला ताब्यात घेतलं आहे. त्यांची पुढील चौकशी उपनगर पोलीस ठाणे करत आहे. परिक्षेचे हे रॅकेट अजून मोठे असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. लिपिक पदाच्या परिक्षेसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींची चौकशी करण्यात येत आहे.