बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जण ठार; अमरावतीत एकाच कुटुंबातील 5 जण दगावले
महाराष्ट्रासाठी आजचा वार हा घातवार ठरला. बुलढाणा आणि अमरावतीमध्ये झालेल्या अपघातात 13 जण दगावले. बुलढाण्यातील सिंदखेड राजा जवळ जुन्या महामार्गावर झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले. तर, अमरावतीमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण दगावले. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर सिंदखेडराजा जवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, निम्म्या एसटी बसचा चक्काचूर झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त एसटी बस ही छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे जात होती. त्यावेळी बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर, 13 प्रवाशी जखमी झाले.
जखमींना तातडीने सिंदखेडराजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. एसटी बस ही भरधाव वेगाने वाशिमच्या दिशेने जात होती. तर कंटेनर हा सिंदखेडराजाकडे जात होता. यावेळी दोघं वाहनांची समोरासमोर धडक झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अमरावतीमधील दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ भीषण अपघात
अमरावतीमधील दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बाबळी येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्नसमारंभ करून रात्री परत दर्यापूरकडे येत असताना आयशर वाहनाने पाठीमागून त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये वाहनातील एकाच कुटुंबातील 12 जनांपैकी 2 जणांचा जागेवरच तर एकाचा दर्यापूर येथे आणि दोघांचा अमरावती आणत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. उर्वरित सात जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.