परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मध्ये बेरोजगाराची धूम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; जिल्हाभरातून हजारो उमेदवार
(प्रतिनिधी) परभणी/ राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाने ४५५ शिकाऊ शिक्षकांची भरती प्रक्रिया आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील विविध तालुक्यांतील डीएड व बीएड धारक महिला, पुरुष उमेदवारांनी सकाळपासुनच अर्ज देण्यासाठी मोठी गर्दी(Crowd)केली आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील दुसर्या माळ्यावर अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी अर्ज देण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
तसेच दुसर्या माळ्यावरील दालनात देखील उमेदवारांनी गर्दी केली आहे. उमेदवारांची आलेली संख्या पाहता शिक्षण विभागाची अर्ज (application) स्विकारण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून विशेषत: महिला शिक्षक उमेदवार लहान बाळांना घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना लांबच लांब रांगेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुपारी साडेबारा नंतरही शिक्षक उमेदवारांची आवक सुरुच असल्याने जि.प. कार्यालयाच्या मुख्य गेटवर वाहनांची कोंडी होत आहे. उमेदवार, वाहनांनी जिल्हा परिषद परिसर गजबजून गेला आहे.
अर्ज स्विकारण्याची यंत्रणा अपुरी जिल्हाभरातून हजारो शिक्षक उमेदवार योजनेंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने अर्ज स्विकारण्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे अर्ज स्विकारण्याचे टेबल वाढविण्याची मागणी उपस्थित शिक्षक उमेदवारांतून होत आहे. दालनावर कुठेही बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे उमेदवारांना रांगेत तासन् तास उभे राहावे लागत आहे. या विषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.