जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळ मारतळा येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कचरा पेट्या केले तयार
नांदेड,२४- मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कचरा पेट्या तयार करून एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना बालवयातच ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावून देणे हा होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील उपलब्ध टाकाऊ वस्तूंपासून दोन कचरापेट्या तयार केल्या. एकात ओला कचरा तर दुसऱ्यात सुका कचरा टाकण्यासाठी या पेट्या वापरण्यात येणार आहेत. शाळेच्या आवारात या कचरापेट्यांची प्रदर्शनी भरवण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कचरा पेट्या केवळ शाळेपुरत्या मर्यादित न राहता त्यांनी आपल्या घरांमध्ये आणि परिसरातही या पेट्यांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनीही ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकण्याचे महत्त्व जाणून घेतले. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यकाळातही असेच सृजनशील उपक्रम राबविण्याचे प्रोत्साहन दिले.
या प्रसंगी मारतळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चंद्रकांत पुंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.