स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला सुरुवात गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
नांदेड,१६- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला जिल्हयात सुरुवात झाली असून १५ आँगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गावातील स्वच्छतेला नवीन आयाम देण्यासाठी बचतगट संवाद मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. या मोहिमेचे उद्दिष्ट गावपातळीवर स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, शौचालयांचा नियमित वापर सुनिश्चित करणे आणि गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आहे.
बचत गटाच्या महिलांनी या मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे, गाव मॉडेल करण्यासासंदर्भात चर्चा करावी. त्याबरोबर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना एकत्रीत करुन संवाद साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांनी स्वच्छतेविषयी संवाद साधताना घराच्या बाहेरची व आजूबाजूची स्वच्छता राखण्यावरही भर द्यावा, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
या मोहिमेत गावातील बचत गट, ग्रामपंचायत, आणि इतर स्थानिक संस्था यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. मोहिमेच्या यशस्वितेसाठी गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच स्वच्छतेचे महत्त्व केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण गावासाठी स्वीकारावे. शासनाच्या वतीने अशा मोहिमांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्वच्छता ही फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक व सामाजिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे, असेही या मोहिमेव्दारे लोकांना पटवून दिले जाणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या.
या मोहिमेत गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उमेदच्या संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक तथा उमेद अभियानाचे जिल्हा सह संचालक डॉ. संजय तुबाकले, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, यांनी केले आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत ही मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.