हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या तीन विद्यार्थिनींची इस्रो सहलीसाठी निवड
इयत्ता पाचवीची संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी कु.श्रावणी हिमायतनगर तालुक्याची
हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टेंभी, खडकी बा येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन विद्यार्थिनींची इस्रो अंतरिक्ष सेंटर श्रीहरीकोटा हवाई सहल 2023 साठी निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या शाळामधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची आंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा ,आंध्रप्रदेश तसेच थुंबा स्पेस म्युझियम बेंगलोर ,वीरेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम तिरुअनंतपुरम या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळास्तर,केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तरावरील चाचणी परीक्षेतून निवडून येणाऱ्या गुणवंत मुलांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा,शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी ,शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने आयुक्त कार्यालय औरंगाबाद व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या पात्रतेची चाचणी परीक्षा घेण्यात आली.
जिल्हास्तरीय परीक्षेस एकूण 167 विध्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी अंतिम 50 यशस्वी स्पर्धकात हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु.श्रावणी सुधिर पौळकर हिची ईस्त्रो अंतरिक्ष सेंटर श्रीहरीकोटासाठी झाली. या निवड यादीत इयत्ता पाचवीची संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी कु.श्रावणी हिमायतनगर तालुक्यातील असून, तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तसेच हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीतील श्रावस्ती चंद्रकांत भगत व किरण बबन भगत या दोन विद्यार्थिनींची देखील या सहलीसाठी झाली आहे. सहलीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे हिमायतनगर शिक्षण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री शिवाचार्य साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी श्री अरूण पाटील ,मुअ श्री नामदेव राठोड,मार्गदर्शक शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.