कारवर पोलीस नावाचं स्टीकर अन् अंबर दिवाही, पथकाने पकडताच समोर आली धक्कादायक माहिती
पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका तोतयाला बेड्या ठोकत अटक केली आहे.
विशेष म्हणजे हा तोतया चोर कारवर पोलीस नावाचं स्टीकर लावून अंबर दिवा गाडीत ठेवून मिरवत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीची एक स्कॉर्पिओ देखील ताब्यात घेतली आहे. संजय ऊर्फ मदन सुंदरराव पोपळघट (वय 33 वर्षे, रा. राऊतनगर, जालना, ह. मु. व्यंकटेशनगर रेसिडेन्सी, हिरापूर शिवार) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील संजय ऊर्फ मदन सुंदरराव पोपळघट या तोतयाला गुन्हे शाखेने गजाआड केले. त्याच्याकडून कार, दुचाकी, लोखंडी पिस्टल, पोलिस कॅप, अंबर दिवा, असा 10 लाख 90 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चोरायचे आणि त्यावर बनावट क्रमांक टाकून पोलिस नावाचे स्टिकर लावून ते वापरायचे, असा प्रकार तो करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने 26 मार्च रोजी भीमवाडी, सुंदरवाडी परिसरात कारवाई केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे.
पोलिसांनी लावला सापळा…
शहरातील चिकलठाणा येथील मिनी घाटी परिसरातून 25 मार्चला एक स्कॉर्पिओ चोरीला गेली होती. दरम्यान पोलिसांकडून या चोरीच्या गाडीचा शोध सुरु असतानाच, ती बीड बायपास परिसरातील भीमवाडी सुंदरवाडी येथे उभी असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, अंमलदार योगेश नवसारे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, तातेराव शिनगारे, ज्ञानेश्वर पवार, अश्वलिंग होनराव यांच्यासह सापळा लावला.
कारमध्ये अंबर दिवा, लोखंडी पिस्टल
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावून लक्ष ठेवून होते. दरम्यान याचवेळी संजय ऊर्फ मदन पोपळघट हा तेथे आला. आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कारची झडती घेतली असता त्यात पाठीमागे पोलिस असे स्टिकर लावलेले दिसले. समोर पोलिस अधिकाऱ्याची कॅप ठेवलेली होती. कारमध्ये अंबर दिवा, लोखंडी पिस्टल आढळून आली आहे. चोरीच्या वाहनाबाबत कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पोलिस नावाचा वापर केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, तो ज्या दुचाकीवरून कारजवळ आला, त्या दुचाकीवरही पाठीमागे पोलिस लिहिलेले होते. यावरून तो पोलिस नावाचा वापर करून चोरीची वाहने लपवत असल्याचा संशय बळावला आहे.