खलिस्तानला विरोध कराल तर इंदिरा गांधींप्रमाणे परिणाम भोगाल; अमृतपाल सिंह याची अमित शाहांना थेट धमकी
अमृतसर: पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट धमकी दिली आहे.
खलिस्तानी चळवळीच्या विरोधात जाल तर इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना चुकवावी लागलेली किंमत तुम्हालाही चुकवावी लागेल अशी उघड धमकी त्याने दिली आहे. अमित शाह यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचं समर्थन केलं तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतील हेदेखील पाहून घेऊ असंही तो म्हणाला.
अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. या गोंधळावेळी सहा पोलीस गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांनी खलिस्तानी चळवळ पुढे जाऊ देणार नाही असं म्हटलं होतं, इंदिरा गांधींनीही असंच म्हटलं होतं असं अमृतपाल सिंह म्हणाला. तसं खरंच काही केलं तर इंदिरा गांधींच्या प्रमाणे तुम्हालाही परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच त्याने अमित शाह यांना दिली.
अमृतपाल सिंह म्हणाला की, “जेव्हा लोक हिंदू राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत.”
याआधीही अमृतपाल सिंहने एका कार्यक्रमात अमित शाह यांना धमकी दिली होती आणि पंजाबचा प्रत्येक तरुण खलिस्तानबद्दल बोलत असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता तो म्हणाला की, “इंदिरा गांधींनीही दबाव टाकला, त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे. अमित शहा यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही आमचं शासन मागत आहोत, दुसऱ्याचं नाही.”
गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच खलिस्तान समर्थकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले होते.
खलिस्तानी समर्थकांनी नाचवल्या नंग्या तलवारी
अमृतपालच्या साथीदाराच्या अटकेच्या निषेधार्थ पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या समर्थकांनी नंग्या तलवारी आणि बंदुका नाचवल्या आणि पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. सुधीर सुरी हत्येप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर संदीप सिंगला घटनेनंतर काही वेळातच अटक केली होती. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या गाडीवर खलिस्तानींचे पोस्टर चिकटवण्यात आले होते. याशिवाय संदीपच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील नुकत्याच झालेल्या पोस्टवरून तो कट्टरपंथी असल्याचे समोर आले आहे. संदीप सिंगने अमृतपाल सिंगचे अनेक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले होते. ज्यामध्ये खलिस्तान समर्थक नेत्याला भेटल्याचा व्हिडीओही होता.
भिंद्रनवालेचा समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख
अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीच्या जर्नेलसिंह भिंद्रनवालेचा समर्थक मानला जातो. ‘वारीस पंजाब दे’ ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूने स्थापन केली होती. अमृतपाल सिंह याला सप्टेंबरमध्ये या संस्थेचे प्रमुख बनवण्यात आलं. 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.
पंजाबचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी अमृतपाल सिंहचे नावही पुढं आलं होतं. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंह याला मोगाच्या सिंगवाला गावात नजरकैदेत ठेवले होते.