नांदेडच्या सुप्रसिद्ध ” संगीत शंकर दरबार २०२३”च्या पूर्वसंध्येला, आज आघाडीच्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा “लाईव्ह इन कॉन्सर्ट” कार्यक्रम
नांदेड दिनांक 24 फेब्रुवारी
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘ संगीत शंकर दरबार ‘ कार्यक्रमाचे उद्या दिनांक 25 फेब्रुवारी शनिवार रोजी उद्घाटन श्री शारदा भवन शिक्षण सोसायटीच्या कार्यकारणी सदस्य कु. सुजया अशोकराव चव्हाण आणि कु.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या कार्यक्रमाची विशेषत्वाने नोंद घेतली जाते. देशभरातील नावाजलेल्या, दिग्गज गायकांची या निमित्ताने नांदेड शहरांमध्ये मांदियाळी रसिकांना अनुभवायला मिळते.
उद्घाटनानंतर ‘ नटरंग, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जोधा अकबर अशा गाजलेल्या चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या मराठी, हिंदी आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा ‘ लाईव्ह इन कॉन्सर्ट ‘ हा कार्यक्रम होणार असून यांमध्ये स्वर्गीय लता मंगेशकर यांना स्वरांजली व बेला शेंडे यांच्या गाजलेल्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामध्ये यावर्षीही दिग्गज कलावंतांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून नांदेडकरांना राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज कलावंतांच्या संगीत मेजवानीचा लाभ घेता येणार आहे.तीनही दिवस होणारे सर्व कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंचावर संपन्न होणार आहेत. रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या या महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष सौ अमिताताई चव्हाण, सचिव डी पी सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष रावसाहेब शेदांरकर आणि अन्य सर्व पदाधिकारी तसेच संयोजन समितीतील सदस्य पं.संजय जोशी ,रत्नाकर अपस्तंभ, सौ.अपर्णा नेरलकर, हृषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख व विश्वाधर देशमुख यांनी केले आहे.