सांगवी (बु.) परिसरात नवीन सोमवार आठवडी बाजार सुरू
नांदेड दि.२० नांदेड शहराचाच भाग असलेला एक दुर्लक्षित परिसर म्हणजे विमानतळाच्या बाजूचे सांगवी हे गाव मागील 25 वर्षापासून महानगरपालिकेत समावेश होऊन देखील शहरापासून अलिप्तच असल्याचे दिसून येते याचे कारण म्हणजे शहरातील विमानतळामुळे व रेल्वे डिव्हिजन मुळे सांगवी हा परिसर नांदेड शहरापासून विभक्तच होऊन राहिला आहे. या परिसरातील नागरिकांना आठवडी बाजारासाठी तरोडा येथील बुधवार बाजार हा पर्याय होता. यामुळे सांगवी परिसरातील नागरिकांनचा वेळ व पैसा खर्च होत होता, नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन सांगवी प्रभागाचे माजी नगरसेवक प्र.श्याम पाटील कोकाटे यांच्या पुढाकारातून सोमवार या दिवशी या परिसरात बाजार भरविण्यात आलेला आहे, मागील काही दिवसापासून श्याम भाऊ कोकाटे मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक बाजारातील व्यापाऱ्यांना पत्रकाच्या माध्यमातून विनंती केली की, आपण सांगवी परिसरात नव्याने सुरू होत असलेल्या सोमवार बाजारामध्ये आपले दुकान थाटावे त्यांच्या या अवाहानाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि या परिसरामध्ये आजचा पहिलाच बाजार चांगलाच फुलल्याचे दिसून आले. नागरिकांनी देखील सदरील बाजारांमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आठवडा भरासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची खरेदी केली. भविष्यात सांगवी परिसरातील सोमवार बाजार हा प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा श्याम पाटील कोकाटे यांनी व्यक्त केली. या बाजारपेठेत व्यापारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात नगरसेवक प्रतिनिधी श्याम पाटील कोकाटे आणि सांगवी(बु.)येथील नागरिकांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.