डॉ. शंकररावजी चव्हाण स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर
नांदेड (प्रतिनिधी) – केंद्रीय गृहमंत्री, लोकनेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय डॉ.शंकररावजी चव्हाण स्मृती वक्तृत्व स्पर्धा दि. १२ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. दरम्यान या स्पर्धेचे निकाल सोमवार (ता.२०) रोजी घोषित करण्यात आले आहेत.
प्रथम पुरस्कार दहा हजार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र बालाजी वरवटे (भोकर) व व्यंकट शिंदे (नांदेड) यांना विभागून जाहीर करण्यात आला आहे. द्वितीय पुरस्कार पाच हजार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र हर्षवर्धन आलासे (सांगली) व रोहित आढाव (नांदेड) यांना विभागून तर तृतीय पुरस्कार तीन हजार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, मनोज मुंडे (बिड) व नितीन कसबे (नांदेड) यांना विभागून जाहीर करण्यात आला आहे. समान गुणामुळे प्रोत्साहनपर पुरस्कार स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आशिष साडेगावकर (हिंगोली) माहेश्वरी नवबदे (नांदेड) भाग्यश्री मोरे (नांदेड), अंकुश दुर्गेकर (हदगाव), अंकिता कदम (नांदेड) राजश्री गाडे (नांदेड) यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे. नांदेडसह सांगली, हिंगोली, बिड, लातूर, परभणी येथून ६२ युवक युवतींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षण प्रा. कल्पना जाधव यांनी केले. स्पर्धेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, स्पर्धेचे मार्गदर्शक अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, नांदेड तालूकाध्यक्ष मनोहर पाटील शिंदे आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.