पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला स्थगिती ‘क्राईम ब्रांच’च्या खुर्चीसाठी ‘मॅट’मध्ये धाव; अवघ्या 24 तासात बदली रद्द,
पोलीस दलात महत्वाच्या शाखेत वर्णी लागावी म्हणून, अनेकदा अधिकारी प्रयत्न करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळतात. दरम्यान नांदेड पोलीस दलात देखील काही अशाच काही घडामोडी घडताना पाहायला मिळाले.
नांदेड पोलीस दलात ‘क्राईम ब्रांच’च्या खुर्चीसाठी वेगवान घडामोडी घडल्या आणि 24 तासात ‘क्राईम ब्रांच’चे विद्यमान पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची बदली रद्द झाली. विशेष म्हणजे आपल्या अन्यायकारक बदलीला न्यायाधिकरण (मॅट) मध्ये चिखलीकर यांनी दाद मागितली होती. तर एखादा अन्यायग्रस्त अधिकारी मॅटमध्ये जाऊन पुन्हा तीच खुर्ची मिळवतो, ही नांदेड पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 85 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रमुख द्वारकादास चिखलीकर यांची ग्रामीण ठाणेदार म्हणून बदली झाली होती. तर चिखलीकर यांच्या सेवानिवृत्तीला केवळ सात महिने शिल्लक आहेत. त्यामुळे बदली अधिनियम 2005 आणि 2018 च्या शासन परिपत्रकानुसार त्यांची बदली इतरत्र करता येत नाही किंवा त्यांच्या इच्छेशिवाय बदली करू नये, असे बंधनकारक आहे. मात्र असे असताना त्यांची बदली झाल्याने त्यांनी थेट ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती.
दरम्यान नियमाच्या विरुद्ध आणि राजकीय दबावातून आपली बदली झाल्याचा आरोप करून चिखलीकर यांनी ‘मॅट’मध्ये दाद मागितली होती. यापूर्वी चिखलीकर यांनी दोन वेळेस पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन माझी बदली करू नये, अशी मागणी केली होती. तसेच बदली केल्यास मॅटमध्ये जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. याउपरही त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी बदलीचे आदेश हाती पडताच चिखलीकर यांनी थेट औरंगाबाद गाठून ‘मॅट’मध्ये बदली रद्द करण्याची मागणी केली होती. तर मंगळवारी चिखलीकर यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन ‘मॅट’ने त्यांची ग्रामीण ठाण्यात झालेली बदली रद्द केली. तसेच पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या आदेशाला स्थगिती देत चिखलीकर यांची गुन्हे शाखा प्रमुखपदाची नियुक्ती कायम ठेवली.
पोलीस दलात चर्चेचा विषय!
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 85 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. पण यात सर्वाधिक चर्चेचा विषय चिखलीकर यांच्या बदलीचा होता. दरम्यान या बदलीवरून पोलीस दलात देखील नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच शासन निर्णयानुसार त्यांची बदली देखील करता येत नव्हती. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक यांना तसे कळवले देखील होते. मात्र तरीही त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते, त्यामुळे याची पोलीस दलात मोठी चर्चा होती.