देगलूर नाका परिसरातील रस्ते तात्काळ दुरूस्त करा -राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
वर्क ऑर्डर निघूनही कामाला प्रत्यक्ष सुरवात होईना
नांदेड. शहरातील देगलूर नाका भागातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. सदरील रस्त्याच्या कामाचे वर्क ऑर्डर निघाले असले तरी अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रस्त्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. येथील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देगलूर नाका हा परिसर मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जातो. कष्टकरी, गोरगरीब कामगार नागरिकांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. परंतू महापालिकेकडून मुलभूत सुविधा अजूनही पोहोचल्या नाहीत. महापालिकेने मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी वारंवार राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. परंतू महापालिकेकडून अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. गल्ली नं.9 येथे 45 लाख रूपयाच्या रस्त्याचे काम 2 वर्षापुर्वी मंजूर झाले आहे.
परंतू गुत्तेदाराने अद्याप काम सुरू केले नाही. या भागातील काही माजी नगरसेवक गुत्तेदारांना हताशी धरून रस्त्याचे काम होऊ देत नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला. देगलूर नाका परिसरात ज्या रस्त्याच्या कामाचे वर्क ऑर्डर झाले आहे परंतू काम अद्याप सुरू झाले नाही अशा कामाची चौकशी करून तात्काळ काम सुरू करावे अन्यथा महापालिका आयुक्तांना साडी-चोळी व बांगड्याचा आहेर देण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ जमीनदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, अॅड.प्रमोद नरवाडे, फैसल सिद्दीकी, पंकज कांबळे, सरफराज अहेमद, मिर्झा खदीर बेग, शरणजितसिंघ, साजेद अहेमद, प्रभाकर भालेराव, जावेद भाई यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.