भर व्यासपीठावरच खासदार भावाला बहिणीने सुनावले खडे बोल
नांदेड जिल्ह्यातील लोहा इथल्या राजकारणात भाऊ आणि बहिणीत कलगीतुरा रंगताना दिसत आहे.
भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे भाऊजी श्यामसुंदर शिंदे हे लोहा कंधारचे आमदार आहेत. काल शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी आपल्या खासदार भावावर तोंडसुख घेतले, तर खासदारांनी देखील आमदार असलेल्या आपल्या भावोजीवर टीका केली आहे. कुटुंबातला हा वाद आता चव्हाट्यावर आला असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
झालं असे की, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी, शेकाप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी भर व्यासपीठावर खडे बोल सुनावले. एका महिलेचा अपमान करुन बोलणाऱ्या खासदाराला लाज वाटते का, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. दरम्यान, आशाताई या चिखलीकरांच्या भगिनी आहेत. राजकीय वाटा वेगळ्या असल्याचे दोघांत मतभेद आहेत.
नेमकं काय घडलं!
शिवजयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून कंधार-लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते. तर याचवेळी आशाताई शिंदे या देखील व्यासपीठावर होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी लोहा येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणावरुन खासदार आणि आमदार यांच्यात श्रेयवादाची जुगलबंदी सुरु होती. त्यामुळे शिवजंयतीनिमित्त लोह्यात झालेल्या कार्यक्रमात खासदार चिखलीकर यांनी आपल्या भाषणात आमदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच आपल्या बहिणीवर टीका केली होती. त्यामुळे त्याच टीकेला आशाताई शिंदे यांनी रविवारी झालेल्या कार्यक्रमातून उत्तर दिले.
आशाताई शिंदे यांनी चिखलीकरांचे नाव न घेता त्यांना व्यासपीठावरच खडे बोल सुनावले. “छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना मोठा सन्मान, चांगली वागणूक दिली होती. आजचे राजकारणी लोक शिवरायांच्या पुतळा अनावरणप्रसंगी स्वतःच्या बहिणीची टिंगलटवाळी करत होते. अशा राजकीय लोकांचा जनतेने काय आदर्श घ्यावा? स्वतःच्या बहिणीला बोलता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बहिणीला तुम्ही सोनिया गांधी म्हणत होता, त्याच बहिणीला तुळजाभवानी म्हणता. स्वतःच्या बहिणीला बोलणाऱ्यांची मानसिक प्रवृत्ती काय असेल?” अशा शब्दांत त्यांनी आपल्या खासदार भावाला सुनावले. त्यांच्या याच टीकेची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे.
खासदार चिखलीकर यांचे उत्तर!
दरम्यान बहिणीच्या टीकेला उत्तर देताना खासदार चिखलीकर यांनी असे किती शनी आले आणि गेले. पैशांची मस्ती मी बघून घेतो. लोहा येथील शिवाजी महाराजांचा पुतळा मी स्वतः उभारला आहे. हे जनतेला माहित असल्याचं म्हटलं. तसेच कोण तुझा नवरा अन् तू कोण आशा शब्दात आपल्या बहिणीला उत्तर दिले.