देश विदेश
अबकी बार किसान सरकार! तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नांदेडमध्ये नारा
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मागील ७५ वर्षात अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा जनतेला मिळाल्या नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या दुरावस्थेस कॉंग्रेस व भाजपच जबाबदार आहे.. शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी गुलाबी झेंडा उचला व किसान सरकार सत्तेत आणा, असे म्हणत भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला. नांदेड शहरातील हिंगोली गेट मैदानावर आज (दि. ५) आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते प्रकाश पोहरे, तेलंगणाचे वन व पर्यावरण मंत्री इंद्रकरण रेड्डी, खासदार बी. बी. पाटील, आमदार बलका सुमन, आमदार शकील आमेर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
यावेळी के. चंद्रशेखर राव म्हणाले की, पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती तेलंगणापुरती मर्यादीत होती, आता देशाची बदललेली अवस्था व विचारधारा पाहून परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने भारत राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशभरात बीआरएस ला मोठा प्रतिसाद लाभत असून, देश चालविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. आतापर्यंत अनेक पक्ष व नेते आले या सर्वांना आपणच पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार बनविले, त्यांनी काय केले? केवळ मोठमोठी भाषणे केली. त्यानंतर त्यांची सरकारे आली व गेली. मात्र पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा देखील ते देवू शकले नाहीत, अशा टीकाही केसीआर यानी केली.
निवडणुका आल्या की, नेते रंगीबिरंगी झेंडे घेवून येतात व भाषणे देतात. मग शेतकयांच्या आत्महत्या का थांबत नाहीतर असा सवाल त्यांनी यावेळी केला धर्म, जात, राजकीय पक्ष, झेंडे यांचा वाटणी न करता शेतकऱ्यांनी वज्रमुठ केली तर अबकी बार किसान सरकार है स्वप्न सत्यात येवू शकेल. देशात 50 टक्के पेक्षा जास्त शेतकरी आहेत, सरकारपेक्षा मोठी ताकद शेतकऱ्यांची आहे. महाराष्ट्रात गोदावरी, कृष्णा प्रवरा, पूर्णा यासारख्या नद्या असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या अवस्थेस कॉंग्रेस व भाजपच जबाबदार आहे, असे ते यावेळी म्हणाले. या सभेत अहेरीचे माजी आमदार दीपक आमात्र यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला.
तेलंगणामध्ये २४ तास वीज, शुद्ध पाणी है शक्य झाले आहे, ते महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात का होवू शकत नाही? असा सवाल करत केसीआर यांनी परिवर्तनासाठी गुलाबी झेंडा उचला, असे आवाहन केले. आगामी काळात राज्यात बीआरएसचा विस्तार कला जाईल, याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर शपथ घेवून केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.