संविधान विषयक जागृती आजची मूलभूत गरज-प्रा.भुकतरे
शंकरनगर दि.३१ भारतीय संविधाना विषयी समाजामध्ये जनजागृती होणे ही आज मूलभूत गरज आहे. कारण संविधानाची माहिती नसल्यामुळे अनेक लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याचबरोबर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे संविधान विषयी जनजागृती झाली तर अनेक प्रश्न निर्माण होण्याअगोदरच सुटू शकतील असे मत प्रा. बाबासाहेब भुकतरे यांनी व्यक्त केले. ते कै.मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकर नगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उदबोधन शिबिरात लोहगाव येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.शिवाजी कांबळे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ. डाखोरे यांनी केले.स्वागत गीत गंगुताई पंदीलवाड हिने गायले.पुढे प्रा.भुक्तरे म्हणाले की,भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे यामध्ये धर्मनिरपेक्षता, बंधुत्व,समता,लोकशाही, स्वातंत्र्य,मानवता यासारख्या अनेक मानवी मूल्यांची जोपासना केली आहे. समाजामध्ये संविधान विषयक जनजागृती नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते जर संविधान विषयी जनजागृती झाली तर नागरिकांच्या समस्या निर्माणच होणार नाहीत त्यामुळे संविधान जागृती ही एक मूलभूत गरज आहे. यावेळी प्रा.शेख नजीर यांनी देखील व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सकारात्मक विचार हा व्यक्तिमत्व विकासाचा मूलमंत्र आहे असे प्रा.शेख नजीर यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्लेषा पाटील हिने केले तर आभार अंकिता वाघमारे ने मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी उपस्थित होते.