लातुरात लिपिकाने केलेला घोटाळा पोहचला 26 कोटींवर; नव्या माहितीनं खळबळ
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील एका लिपिकाने विविध योजनांच्या सरकारी निधीतून केलेल्या घोटाळ्यात आता आणखी नवीन माहिती समोर आली आहे.
ज्याने महसूल विभागात (Revenue Department) खळबळ उडाली आहे. लातूर शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यांतील 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र पुढे सुरू असलेल्या तपासात रक्कमेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर 22 कोटींचा आकडा आता 26 कोटींच्या घरात गेला आहे. तर या घोटाळ्याची लातूर जिल्ह्याभरात व्याप्ती वाढत आहे.
असा सुरू होता घोटाळा…
हा प्रकार 2015 ते 2022 असा एकूण सात वर्षांतील असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
महसूल शाखेतील तत्कालीन लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्याकडे बँक खात्याचा कारभार होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश होता. जलसंधारण अधिकाऱ्यांना दोन धनादेश देण्यात आले होते. ज्यामध्ये 12 लाख 27 हजार 297 रुपये आणि 41 लाख 06 हजार 610 रुपये आरटीजीएसद्वारे वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आले होते. मात्र, खात्यात केवळ 96 हजार 559 रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. यामुळे अपहार प्रकरणाचे धागेदोरे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले. तसेच अन्य एका खात्याचेही लेखापरीक्षण करण्यात आले. ज्यामध्ये स्वाक्षरी आणि मूळ रकमेत बदल केल्याचे निदर्शनास आढळून आले. शासकीय खासगी खात्यात वर्ग केल्याचे निदर्शनास आले.
कसा केला घोटाळा?
मनोज फुलेबोयणे या लिपिकाने बनावट प्राधिकारपत्र तयार केली. अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यातून कोट्यवधी रुपये भाऊ अरुण प्रोप्रायटर असलेल्या तन्वी कृषी केंद्र, तन्वी अॅग्रो एजन्सीज आणि ऋषीनाथ ॲग्रो एजन्सीजच्या बँक खाते तसेच सुधीर देवकते आणि चंद्रकांत गोगडे यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. यासोबत धनादेशातील अक्षरी, अंकी रक्कमेच्या ठिकाणी रिकामी जागा ठेऊन त्यानंतर त्यात वाढ करुन रक्कम लाटली. तर या प्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनोज नागनाथ फुलेबोयणे याच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे अशी आरोपींची नावं आहेत.
दोघांना अटक, दोन फरार
कोट्यवधींच्या अपहार प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चारपैकी मनोज नागनाथ फुलेबोयणे, चंद्रकांत नारायण गोगडे यास अटक केली आहे. तर अरुण फुलेबोयणे आणि सुधीर रामराव देवकते हे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांच्या शोधासाठी पोलीस मागावर आहेत. मात्र त्यांचा सुगावा काही लागत नसल्याचे चित्र आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सहा अधिकाऱ्यांना नोटीस
जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून मनोज फुलबोयने यांनी सात वर्षात तब्बल 26 कोटीच्या वर अपहार केल्याची माहिती समोर आल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या सात वर्षाच्या काळात कार्यरत असलेले तत्कालीन सहा तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आले आहेत. आता त्यांच्यामागे खातेनिहाय चौकशी लागली आहे.