क्राईम
धक्कादायक! नांदेड ऑनर किलिंगने हादरले; भाऊ, वडिलाने मुलीचा खून करून राख ओढ्यात टाकली
नांदेड : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच त्यांच्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मृत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळल्याचे समोर आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, 23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यापूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना, काही कारणामुळे आठ दिवसांपूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला होता. मुलीमुळे गावात बदनामी झाली. या कारणाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राखदेखील बाजूच्या ओढ्यात टाकून दिली.
तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुले अशा पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.