कौश्यल्यावर आधारित शिक्षणावर भर द्यावा- डी.पी.सावंत
नांदेड,दि. 23, देशामध्ये लवकरच नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणामध्ये शिक्षणात अमुलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. केवळ पाठ्यपूस्त्ाकाच्या ज्ञानातून विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो, असे नाही. तर त्या सोबत त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कौश्यल्यावर आधारित शिक्षणावर शिक्षकांनी भर द्यावा, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी केले.
येथील श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षिय समारोप करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव ॲड. उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष कदम, राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.के.तायडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक यु.एस.दुगाळे, पर्यव्ोक्षक एस.एन.सूर्यवंशी, इन्चार्ज के.एच.गंड्रस, अरुण कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
डी.पी.सावंत पुढे म्हणाले की, शहर व जिल्ह्यातील गोरगरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांनी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयाचे जाळे विणल्या गेले आहे. या संस्थेच्या उभारणीत पद्मश्री श्यामराव कदम, लक्ष्मणराव हस्सेकर, एस.के.निंबाळकर, के.एम.देशमुख, बी.जी.फालक, नारायणराव वाघमारे या त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला झोकुन दिले होते. त्यामुळेच शाळा, महाविद्यालयाची गुणवत्ता आजही टिकुन आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून पुढे चालण्याचा आमचा प्रयत्न सदैव राहीला आहे.
यावेळी बोलताना माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे म्हणाले की, डॉ.शंकरराव चव्हाण यांचे कार्य आकाशाएवढे मोठे होते. त्यांना आपण आपल्या जीवनात पाहिले व त्यांचे कार्य अनुभवले यातच स्वतःला धन्य समजले पाहीजे. त्यांचे कार्य हिमालयाइतके उंचीचे होते. त्यांच्यामुळेच नांदेड जिल्ह्याचा व मराठवाड्याचा जो विकास झाला आहे. त्याचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही. आई-वडील नसलेल्या अनाथ पोराला केवळ निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या डॉ.शंकरराव चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे शारदा भवन शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी लागली व येथूनच माझ्या यशाचा प्रवास सुरू झाला. आणि राज्याचा शिक्षण संचालक म्हणुन काम करण्याचे भाग्य मला मिळाले. यामध्ये शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी ॲड.उदय निंबाळकर, डॉ.रावसाहेब शेंदारकर यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.के.तायडे यांनी केले. सूत्रसंचलन डी.बी.नाईक यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.एस.एस.पेशवे यांनी मानले. या कार्यक्रमास महात्मा फुले शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.