शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
याचाच एक भाग म्हणजे मुंबईभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटावेज लावण्यात आले आहेत. मुंबईतल्या शिवसेना भवनासमोरही मोठ मोठे बॅनर्स लावण्यात आले होते, पण हे बॅनर मुंबई पोलिसांनी हटवले आहेत.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कटावेज लावल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो, या कारणाने पोलिसांनी हे बॅनर हटवले आहेत. शिवसेना भवन समोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहेत. त्यांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआऊट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा कार्यकर्त्यांनी लावले होते. त्यावरून वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआऊट हटवले.
भाजप-शिंदे गटाचं शक्तीप्रदर्शन
आगामी महानगपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे, त्यानंतर बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधनांच्या सभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला दावोसचा दौरा रद्द केला. या सभेसाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातून मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट आहे.