बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन
नांदेड,२३- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे, ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल.
जिल्ह्यात दौरे करत असतांना ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची निकड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी बुके, हार-शालच्या सत्कारात बदल केला आहे. कार्यालय अथवा दौऱ्यात असतांना अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सत्कार करताना शालेय साहित्य द्यावे. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, तसेच इतर शैक्षणिक साधने असू शकतात, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सहाय्य करतील. एक वही अथवा एक पेन देखील दिला तरी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे स्वागतासाठी अनावश्यक खर्च कमी होईल आणि दुसरे म्हणजे, शिक्षणासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत मिळाल्याने त्यांच्या प्रगतीत सकारात्मक बदल होईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केले.
२२ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात त्यांनी शालेय साहित्यचे देऊन स्वागत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता तालुका स्तरावरील कार्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी देखील बुके, हार, शाल ऐवजी शैक्षणिक साहित्य द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
स्वागतात मिळालेले शैक्षणिक साहित्य दौऱ्या दरम्यान शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षणाचा प्रसार होईल आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होईल. एकंदरीत, हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे भविष्यात इतर संस्थाही अशा उपक्रमांचा अवलंब करतील.
– मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल