आज पासून 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन
नांदेड,21- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या वतीने दिनांक 22 ते 28 जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश असून नांदेड जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा शिक्षण सप्ताह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी करण्याचे आवाहन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केले आहे.
शिक्षण सप्ताह सोमवारी सुरू होत असून 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, दिनांक 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, 24 जुलै रोजी क्रीडा दिवस, 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रमाचा दिवस, 27 जुलै रोजी मिशन लाइफ अंतर्गत इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस आणि 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस घोषित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने वैविध्यपूर्ण उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करावयाचे आहेत.
घोषवाक्य असलेले पोस्टर्स, खेळ, पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत आव्हानात्मक कार्ड तयार करणे, कागद, बांबूच्या काड्या यासारख्या साहित्यापासून खेळणी तयार करणे, अन्न, भाजीपाला याचे तक्ते अशा अनेक विविध उपक्रमामुळे हा सप्ताह एक शैक्षणिक जागर म्हणून ओळखला जाणार आहे.
दरम्यान शैक्षणिक साहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये हस्तलिखितांचे प्रदर्शन शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, दिग्दर्शन वर्ग असे स्टॉल असणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक आणि समाजाचा यामध्ये सहभाग करून घेतल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा शिक्षण सप्ताह पूरक ठरणार आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण सप्ताह निमित्त सर्व उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करून ऑनलाईन लिंक भरावी. तसेच विविध सोशल मीडियावर याचा प्रचार प्रसार करावा असे शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.