सर्व ग्रामपंचायतमध्ये योग दिन साजरा करण्याचे आवाहन
नांदेड,20 जून- 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये योग दिन साजरा करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गाव स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन करुन यामध्ये प्राणायाम, विविध योगासने, आणि ध्यानधारणेचे मार्गदर्शन करावे. योग हा आपला प्राचीन वारसा आहे आणि त्याच्या नियमित सरावाने आरोग्य सुधारते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये योग दिन साजरा करून ग्रामस्थांना त्यांचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले आहे.