शासनाचे कार्य राज्यस्थानी शिक्षण संस्थेने घेतले हाती
नांदेड दि.२९, मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या मुला-मुलींच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबिरास शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला. नांदेड दौऱ्यावर आलेल्या आ. बच्चू कडू यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन माहिती घेतली. वर्षभरात दोनदा असे सातत्यपूर्ण पंचविसावे शिबीर असून उपचारातून अनेक रुग्णांनी आजारावर मात केली असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. गाव, वाडी-तांड्यावरील सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचारासाठी शासनाच्या वतीने शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे मात्र शासनाचे कार्य राजस्थानी शिक्षण संस्थेने हाती घेतलेले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याची मुक्त कंठाने प्रशंसा आ. बच्चू कडू यांनी केली आहे.
राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, अंकित अग्रवाल, विजेंद्र काबरा व मूख्याध्यापक नितीन निर्मल, वसतिगृह अधिक्षक संजय शिंदे शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित आहेत. आरोग्य शिबीरातील रूग्णांवर प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे, डॉ. प्रज्ञा गाडगीळ, डॉ. अवि शहा, डॉ. अशा चिटणीससह पस्तीस तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत. शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी भेट देऊन आरोग्य शिबिराबाबतची माहिती घेतली. यापुढे आरोग्य शिबिरासाठी जिल्हा शिघ्र निदान उपचार केंद्राची पूर्ण टिम सहकार्यासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
यानंतर दुपारी दिव्यांगांसाठी कार्य करणारे आ. बच्चू कडू यांनी आरोग्य शिबिरास भेट दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, सह सचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रुग्ण येतात, आत्तापर्यंत ६ हजार रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. शिबिरात आढळलेल्या गरजू रुग्णांवर मुंबई येथे नेत्र व हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना दृष्टी तर अनेकांना चालणे आता शक्य झाले असल्याची माहिती दिली आहे. या उपक्रमाची बच्चू कडू यांनी प्रशंसा करून अपेक्षित सहकार्याचे आश्वासन दिले.
श्री रामप्रताप मालपाणी माध्यमिक शाळेच्या अनुदानासाठी प्रयत्न करणार – आ. बच्चू कडू
सर्वसामान्यांप्रमाणेच दिव्यांगांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. दिव्यांग मुलेही सामान्य विद्यार्थ्या प्रमाणे यश मिळवू शकतात. गेल्या दहा -पंधरा वर्षा पासून विना अनुदानित तत्वावर असलेल्या शाळेचा शैक्षणिक परफॉरमन्स चांगला, दहावीचा रिझल्ट ही शंभर टक्के असल्याने या शाळेला अनुदान मिळणे गरजेचे होते. आता श्री रामप्रताप मालपाणी माध्यमिक शाळेच्या अनुदानासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आ. बच्चू कडू यांनी दिले आहे.