हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधौपचार मोहिम
नांदेड :- सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त जिल्हा असुन या जिल्हयातील वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना या आजाराचा धोका होवु शकतो म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सन २००४ पासुन दरवर्षी हत्तीरोग एकदिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्हयात राबविली जाते. या वर्षी मात्र जिल्ह्यातील १० तालुक्यात (किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड) ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने यावर्षी सुध्दा दि. २६ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ या कालावधीत सदर मोहिमेअंतर्गत आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लाभार्थ्यांच्या घरोघरी जावुन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गौळण व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा कर्मचाऱ्यांसमक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी असे आदेशीत केलेले आहे.
हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकुणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार “बुचेरेरिया बँक्रॉप्टाय” व “ब्रुगीया मलायी” या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते, हातापायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येवून विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दुःख-वेदना सहन कराव्या लागतात.
सद्यस्थितीत नांदेड जिल्हयात दि. १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्वेक्षण करण्यात आले.
सन २०२३ च्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात अंडवृध्दीचे रुग्ण २६५ व हत्तीपायाचे रुग्ण २२०८ असे एकूण २४७३ हत्तीरोगाचे बाहयलक्षणेयुक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच आपल्या जिल्हयात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातुन एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व अति गंभीर आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही.
तेंव्हा डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी दि. २६ मार्च रोजी गावातील बुथवर नियोजन करण्यात येत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पासून आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वयंसेविका व इतर स्वंयसेवक दि. २७ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ दरम्यान आपल्या घरी येतील तेंव्हा दिलेल्या गोळ्या जेवन करुन आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष घेवुन शासनाच्या या राष्ट्रीय मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासुन मुक्त रहावे असे आवाहन श्री अभिजीत राउत, जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये केलेले आहे.