डॉ. बबन जोगदंड यांची बालभारतीच्या सदस्यपदी निवड
नांदेड,26- यशदा पुणे येथील अधिकारी व नांदेडचे भूमिपुत्र डॉ. बबन जोगदंड यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळा च्या समाजशास्त्र विषयाच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
डॉ. बबन जोगदंड हे मूळचे हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र शासनाच्या यशदा या शिखर प्रशिक्षण संस्थेत गेल्या वीस वर्षापासून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला नवलौकिक मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत 25 विषयात पदव्या संपादन केल्या आहेत. या पदव्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
डॉ. जोगदंड हे यशदा यशमंथन या मासिकाचे संपादक असून हे चांगले अभ्यासक, वक्ते व विचारवंत म्हणूनही महाराष्ट्रात परिचित आहेत. त्याचबरोबर ते शासनाच्या विविध समित्यांवर सदस्यही आहेत. मागच्या दोन वर्षापासून ते महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीचे सदस्य सुद्धा आहेत. त्याचबरोबर विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावरही सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. बालभारतीने नुकतीच विविध अभ्यास मंडळावर काही सदस्यांची नियुक्ती केली त्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांना अकरावी- बारावीच्या समाजशास्त्र या विषयासाठी सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.