रविन्द्र सिंघ मोदी यांना विद्या – वाचस्पति मानद उपाधि
नांदेड दि. 14 मार्च : येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि हिन्दीसेवी श्री रविन्द्र सिंघ मोदी यांना त्यांच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल विक्रमशिला हिन्दी विद्यापीठ तर्फे विद्या – वाचस्पति विशेष मानद सन्मान देऊन गौरविण्यात आला. मागील दि. 10 मार्च 2024 रोजी भागलपुर बिहार येथील विक्रमशिला हिन्दी विद्यापीठ केंद्रीय कार्यकारिणी आणि विद्यापीठ अकादमिक परिषद मार्फत हजुरसाहिब नांदेड येथे कार्यरत स. रविंद्र सिंघ मोदी यांना हिन्दी साहित्य, हिन्दी प्रचार प्रसार, हिन्दी पत्रकारिता व विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे संदर्भ घेऊन प्रतिष्ठित उपाधि विद्या – वाचस्पति हा मानद सन्मान बहाल करण्यात आला.
हा बहुमान प्राप्त झाल्यानंतर स. रविंद्र सिंघ मोदी यांनी विक्रमशिला हिन्दी विद्यापीठाचे वरिष्ठ कुलगुरु माननीय डॉ राघवेंद्र नारायण आर्य, मा. कुलपति डॉ संभाजी राजाराम बाविसकर, मा. रजिस्ट्रार डॉ दिपंकर वियोगी यांचे आभार प्रकट केले आहे. तसेच या हिन्दी पत्रकारिता क्षेत्रातील मार्गदर्शक व प्रणाम पर्यटन वर्तमान पत्राचे संपादक श्री प्रदीप श्रीवास्तव यांना विशेष धन्यवाद दिला आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या आशीर्वादामुळे हिन्दी क्षेत्रातील सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळे आपणास हा बहुमान लाभल्याचे प्रतिपादन रविंद्रसिंघ मोदी यांनी केले आहे. रविंद्रसिंघ मोदी हे मागील तीस वर्षाहुन अधिक काळ हिन्दी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा ‘अनावश्यक’ हा हिन्दी काव्य संग्रह खूप गाजला होता. वर्तमान पत्रात नियमितपणे लिखाण करणारे असे लेखक असून अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचे सक्रिय सहभाग आहे. त्यांनी गुरुद्वारा सचखंड बोर्ड कार्यालयात विविध स्तरावर दहा वर्षें काम ही केले होते. त्यांना विद्या – वाचस्पति हा बहुमान प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.