सीईओ मिनल करनवाल यांनी साधला किशोरींशी संवाद; मुलींनो आत्मविश्वासाने पुढे जा
नांदेड,13- तुम्ही कुठपर्यंत शिक्षण घेणार आहात. आधी लग्न की करिअर. एखाद्या निर्णय क्षमतेत महिलांना कितपत अधिकार आहे… हे आहेत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कारनवाल. किशोरींशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तर देत त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून गावा-गावात मुलींच्या सशक्तीकरणासाठी बालिका पंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलींना तिच्या उत्कर्षासह गावातील ठोस निर्णयातही तिला सहभाग घेता यावा, या हेतूने बालिका पंचायत उपक्रम राबवला जात आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी देगलूर तालुक्यातील येरगी येथील बालिका पंचायतच्या मुलींनी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांची थेट त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. याप्रसंगी सीईओ मीनल करनवाल यांनीही त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांची उपस्थिती होती.
मुलींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. करिअर नंतरच विवाहाचा विचार करावा. महिला व पुरुष समान असून घरातील कामांची जबाबदारी देखील दोघांनी वाटून घ्यावी. महिलांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय चांगले करते याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिक्षणासह आरोग्याकडे लक्ष द्यावे. चॉकलेट, कुरकुरे, वेफर्स पेक्षा प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खावेत.
बालिका पंचायतद्वारे गाव विकासात निर्णायक भूमिका घेताना उशीर लागेल परंतु गावात बदल आणि सुधारणा निश्चित होईल, असेही त्या म्हणाल्या. मुलींनी प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मविश्वासाने पुढे येणे गरजेचे आहे. भीती बाळगूनये. नव-नवीन शिकण्याची उमेद ठेवली तरच आपण पुढे जाऊ शकू.
भविष्यात मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे तसेच बालविवाह आणि हुंडा यासारख्या प्रथा तसेच स्त्री पुरुष असमानता समाजातून काढून टाकणे हे बालीका पंचायत उपक्रमाचे उद्देश असल्याचे सीईओ करनवाल यांनी सांगीतले. यावेळी बालीका पंचायतच्या सरपंच योगीता दत्ता वाघमारे, उपसरपंच नागमणी उत्तम बरसमवार, सचिव महादेवी हाणमंत दाणेवार, सदस्या रुद्राणी नरसिंग चेंडके, पुनम चांदू सूर्यवंशी, महादेवी प्रभू गादगे, श्रीदेवी राजू धाकपोड, शिवकांता मलिकार्जून भुरळे, अंजली राजेंद्र वाघमारे, स्वाती मारोती बरसमवार, गावचे सरपंच संतोष पाटील, सहशिक्षक ईश्वर वाडीकर, विजय आमटे, हणमंत दानेवार, गजानन भोकसखेडे आदींची उपस्थिती होती.