महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय – मीनल करनवाल
नांदेड, 2- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जर तिथे दाद मिळत नसेल तर यासाठी आता जिल्हास्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी घेतला आहे.
घरातील कोणतेही प्रौढ व्यक्ती ज्याकडे काम नाही आणि कुशल अंग मेहनीतीची इच्छा आहे तो नरेगा अंतर्गत उपजीविका करू शकतो. हे केवळ अल्पभूधारक पुरते मर्यादित नाही तर बेरोजगार कामगारांसाठी हे खुले राहणार आहे. मात्र यासाठी कामाची मागणी करणे आवश्यक आहे.
काही गावात मागणी करुनही बेरोजगारांचे जॉब कार्ड भरून न घेतल्यामुळे त्यांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यासाठी आता जिल्हा स्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. बेरोजगारांना 9373422680 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून कामासाठी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या शेजारच्या गावात रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. बेरोजगार वंचित राहूनये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हास्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या नरेगा कक्षात ही विशेष हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.
तरी नरेगातंर्गत गाव स्तवरावर काही अडचणी येत असतील तर बेरोजगारांनी 9373422680 या हेल्पलाईन नंबरवर सुट्टीचे दिवस वगळून व कार्यालयीन वेळेत फोन करून आपले संपूर्ण नाव, गाव व तालुक्याची माहिती नोंदवावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केले आहे.