जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेल्या बोगस व निकृष्ट काम दोषी कंत्राटदारावर कारवाई – मीनल करनवाल
नांदेड, 2- जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेल्या बोगस व निकृष्ट कामाचे निरीक्षण करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्यासंदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन 15 कंत्राटदरांना काळ्या यादी टाकले तर 387 कंत्राटदारांना दररोज पाचशे रुपये दंड ठोठावला. याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आभार मानले आहेत.
दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या बोगस कामाचे निरीक्षण करून दोषींवर कारवाई करून इस्टिमेट प्रमाणे वेळेत काम पूर्ण करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई केली. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांची सक्रीयता महत्वाची ठरली.
आता जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सुयोग्य नियोजन करुन कामे सुरळीत सुरु केल्याबद्दल काल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील गव्हाणे, तालुका अध्यक्ष बाबुराव क्षीरसागर व शिवकुमार काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
संघटनेच्या वतीने विविध कामांविषयी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली जातात. परंतु आमच्या निवेदनाची मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई केली. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे काम उत्कृष्ट करण्यासंदर्भात नियोजन केले असल्याचे मत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शिवकुमार काळे यांनी व्यक्त केले.