सोमवार पासून उपांत्यपूर्व सामने रंगणार कोलकाता, पंजाब पोलीस, पुणे, नासिक आणि मुंबईचे संघ उपांत्यपूर्व फेरीत!
(रविंद्र सिंघ मोदी )
नांदेड दि. 14 जानेवारी : 50 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड आणि सिल्वर कप हॉकी स्पर्धा अंतर्गत रविवार साखळी सामने संपले असून सोमवार पासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार असल्याची माहिती आयोजन समेतिचे अध्यक्ष माजी नगर सेवक सरदार गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली. येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर 10 जानेवारी रोजी साखळी सामन्यांना सुरुवात झाली होती. हावडा डिवीजन कोलकाता, पंजाब पोलीस, एसजीपीसी अमृतसर, एमपीटी मुंबई, सेंट्रल रेलवे डिवीजन पुणे, आर्टिलेरी सेंटर नासिक, कस्टम मुंबई आणि साईं एक्सेलेंसी औरंगाबाद ह्या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
वरील विषयी बातमी विस्तारात. रविवारी पाच साखळी सामने खेळविले गेले. पहिला सामना एमपीटी मुंबई आणि इलेवन स्टार अमरावती संघादरम्यान खेळला गेला. एमपीटी मुंबईने अमरावती संघाचा 8 विरुद्ध 0 गोल अंतराने धुव्वा उडविला. एमपीटीच्या स्टेपहेन स्वामी ने सामन्यात गोलांची हैट्रिक साधली. तर फैजुद्दीन सिद्दीकी, अथर्व कांबळे यांनी प्रत्येकी दोन आणि योगेश बोरकर याने एक गोल केला. अमरावतीचा संघ खाता उघडू शकला नाही.
आज खेळविल्या गेलेल्या सेंट्रल रेलवे डिवीजन पुणे विरुद्ध चार साहिबजादा हॉकी अकाडेमी नांदेड सामन्यात देखील पहिल्या सामन्याची पुनरावृति झाली. पुणे संघाने नांदेड संघाचा 8 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. पुणे संघाच्या चिराग माने याने गोलाची हैट्रिक केली. तर अनिल राठोड याने 2, रोहन पाटिल आणि करण चव्हाण यांनी एक गोल करत संघाला विजयी करण्यास हातबार लावला.
तिसऱ्या सामन्यात शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर संघाने दिल्ली यूनिवर्सिटी संघास 2 विरुद्ध 0 गोल अंतराने नमविले. अमृतसर तर्फे हर्षदीपसिंघ आणि हरमनप्रीतसिंघ यांनी एक – एक गोल केला.
चौथ्या सामन्यात आर्टलेरी सेंटर नासिक संघाने 5 विरुद्ध 0 गोल अंतराने इटावा हॉस्टल सैफई संघाचा पराभव केला. नासिक तर्फे महेन्द्र टोपनो याने 2 तर अभिमन्यु धाया, आनंद कुजूर आणि संजय तिडू यांनी प्रत्येकी एक गोल केले.
आजच्या पाचव्या व शेवटच्या साखळी सामन्यात साईं एक्सेलेंसी बिलासपुर संघाने सुफियाना हॉकी क्लब अमरावती संघाचा 3 विरुद्ध 2 गोलाने पराभव केला. संघर्षपूर्ण अशा सामन्यात बिलासपुर तर्फे संदीप ठाकुर याने दोन गोल केले. अरबाज अली याने एक गोल केला. तर अमरावती संघातर्फे आमेर खान आणि तालिब शाह यांनी एक – एक गोल केले. वरील सामन्यात पंच म्हणून लवज्योत सिंघ, भानु प्रकाश, दिनेश मालेकर, नेपोलियन चनामथाबम, बालाजी कुमार, नवदीपकुमार, इंदरपाल सिंघ, अरुणसिंह, संदीप पाठक यांनी काम पाहिले. तांत्रिक पंच म्हणून प्रिंस सिंघ, आणि विजयप्रकाश मांगलूरकर यांनी सहकार्य केले.