मुख्याध्यापिका लाच मागतेय! व्यक्तीचा एसीबीला मॅसेज, सापळा रचला अन् केला करेक्ट कार्यक्रम
धुळे: मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उप कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची १ लाख ३३ हजार ४८४ रक्कम अदा होण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रम शाळा, अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला.
मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप यांच्याकडे तगादा लावला. मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केली. दि.१ जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोसच्या आवारात सापळा रचला. या सापळ्यात मुख्याध्यापिका चार हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ सापडली.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. तपास धुळे एसीबी पोनि रूपाली खांडवी करत आहेत. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोनि रूपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर गोरे, जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केली आहे.