लोकशाही डोलारा धोक्यात संविधान बचावासाठी नव्याने लढण्याची गरज- भीमा कोरेगाव शौर्यदिनी रमेश सोनाळे यांचे प्रतिपादन.
नांदेड, 1- सध्या काळ विलक्षण बदलत चालला आहे. धर्मांध शक्ती पुन्हा एकदा वंचित घटकावर गुलामी लादण्याच्या प्रयत्नात आहे. बाबासाहेबांनी उभा केलेला लोकशाहीचा डोलारा धोक्यात आलेला आहे. समतेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या संविधानालाच तोडण्याची भाषा होत आहे. संविधान वाचले तर आपण वाचू. त्यासाठी संघटित होऊन पुन्हा एकदा नव्याने विचारांची लढाई लढावी लागणार आहे 2024 च्या निवडणुका यासाठी निर्णायक आहेत असे असे प्रतिपादन रमेश सोनाळे यांनी केले.
भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या औचित्याने रिपब्लिकन हक्क परिषदेच्यावतीने येथील म. फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्यासमोर भीमा कोरेगाव शोर्य स्तंभाच्या प्रतीकृतीस अभिवादन व रिपब्लिकन पुरस्कार वितरण व विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत पंय्याबोधी हे होते. कार्यक्रमास महाविरो थेरो, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक महार यांचे 12 वे वंशज मिलिंद राजाराम ईनामदार, 13 वे वंशज अभिजीत इनामदार, मिलिंद लोनपांडे, लेखक डॉ. राजेंद्र गोणारकर, अमरावतीचे सामाजिक कार्यकर्ते विनय सोनुले, कळंबीचे हनीफ मुजावर, संगीताताई विघ्ने, निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, वजीराबादचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, माजी नगरसेवक श्रीकांत गायकवाड, सुनील हटकर संजय भोकरे कवठेकर, एस एन गोडबोले, अब्दुल रौफ अब्दुल गफार, सुखदेव चिखलीकर, विकी वाघमारे, दुष्यंत सोनाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विलास ढवळे व सुभाष काटकांबळे यांनी केले.
प्रारंभी भीमा कोरेगाव स्मृतीस्तंभाच्या भव्य प्रतिकृतीस अभिवादन करण्यात आले.भदंत उपगुप्त महाथेरो व महाविरो थेरो यांनी वंदना व धम्मदेसना दिली. यावेळी मिलिंद ईनामदार, डॉ.भास्कर दवणे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी प्रमुख भाषण केले. सन्मानाचे जिणे मिळवून देणारे संविधान राहणार आहे की नाही यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून 2024 मध्ये न्यायाची लढाई जागरूकपणे लढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भदंत पंय्याबोधी यांनी अध्यक्षीय समारोप केला. आंबेडकरी समूहांनी एकत्रित येऊन समूहाने सर्व समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. भविष्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधून समाजाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशभर अराजक निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे प्रतिगामी लोक या देशात माणसात भेद निर्माण करीत आहेत. दलितांवर अन्याय अत्याचाराचे सत्र चालू आहे. खुलेआम संविधानाच्या प्रति जाळल्या जात आहेत. हे अनेक अघटीत घटनांचे सूचक आहे. संकट जवळ येऊन ठेपले आहे. अशावेळी आपण गाफील राहू नये नव्या लढाईसाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. यावेळी सुभेदार रामजी सकपाळ निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघाच्या वतीने भीमा कोरेगाव स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन हक्क परिषदेच्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अहमदपूर येथील भदंत उपगुप्त महाथेरो यांना धम्मरत्न पुरस्कार, नांदेड येथील शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर दवणे यांना रिपब्लिकन रत्न पुरस्कार, आरपीएफ पोलीस शिपाई किरण गायकवाड यांना सरसेनापती वीर शिदनाक महार रिपब्लिकन शौर्य पुरस्कार, पत्रकार अनुराग पोवळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, डॉ. गजानन ढोले याना रिपब्लिकन विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले. प्रभू सटवाजी सावंत, सुरेश दिगंबर हटकर, संजय विठ्ठलराव भोकरे कौठेकर, राहुल सखाराम वाघमारे आणि सत्यपाल दत्तात्रेय नरवडे यांना रिपब्लिकन मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत सोनाळे शुभम सोनाळे, कुणाल सोनाळे, राज सोनाळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.