जलजीवन मिशनच्या जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा
नांदेड,29- जलजीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जलसे नल देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुपटांची निर्मिती ही स्वतः केली असावी. तसेच पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पाश्वसंगीत, गीत, चित्रीकरण हे स्वतः तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेली लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येऊ नये. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारे लघुपट याबाबतचे कॉपीराईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येकाने सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शूटिंग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीसाठीचा भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणत्याही भावना व स्मिता कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारे राहणार नाहीत याची स्पर्धकाने काळजी घ्यावी. लघुपट स्पर्धेत सहभाग नोंदवून 20 डिसेंबर 2023 पर्यंत प्रकल्प संचालक जलजीवन मिशन, जिल्हा परिषद नांदेड येथे आपला लघुपट सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले आहे. लघुपट निर्मितीसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती, जलसंधारण, हर घर जल घोषित गाव विकास, जलजीवन मिशन यशोगाथा व विविध योजनांचे कृतीसंगम हे विषय राहणार आहेत.
लघुपट स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला एकच विषयावरील लघुपट सादर करता येईल. लघुपट हा 3 ते 5 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 31 हजार, 21 हजार व 11 हजार रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.