मराठवाडा
हिंगोली – मुंबई रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार
हिंगोली (प्रतिनिधि) जिल्ह्यातील नागरीक मागील अनेक वर्षापासून हिंगोली – मुंबई रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी करत आहेत. हिंगोलीकरांसाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी अनेकवेळा रेल्वे रोको आंदोलने करण्यात आली होती. या संदर्भात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची एकाच आठवड्यात दोन वेळा भेट घेत हिंगोलीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करत रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी (दि. २२) हिंगोली – मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यासंदर्भात बैठक बोलवत हिंगोली-मुंबई रेल्वेसेवा लवकरच सुरु केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे.
हिंगोली आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातून रेल्वे लाईन आहे. परंतु, महाराष्ट्राच्या राजधानीशी जोडणारी एकही रेल्वे अद्याप हिंगोली जिल्ह्यातून सुरु करण्यात आलेली नाही. हिंगोली- मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी, अशी खासदार हेमंत पाटील यांनी बैठकीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करुन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवार (दि.२२) हिंगोलीचा जिल्ह्याचा रेल्वे प्रश्न सोडवण्यासंदर्भात दिल्ली येथील रेल्वेभवनात महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती.