सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भाचे दाखले, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
हिंगोली : ओबीसी जनमोर्चा आयोजित ओबीसी एल्गार महामेळाव्यात छगन भुजबळ यांनी त्यांच्या १५ ते २० सभा झाल्यानंतर आची एक सभा होते, असं म्हटलं. ते घरं पेटवत आहेत पण त्यांना सांगायचं आहे की पेटवायला अक्कल लागत नाही पटवायला अक्कल लागते, असं छगन भुजबळ म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला आक्षेपार्ह मेसेज केले जात आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. अधिकाराची लढाई असते त्यावेळी आमंत्रणाची वाट पघत बसू नका, असं आवाहन भुजबळ यांनी इतर ओबीसी नेत्यांना केलं.
मनोज जरांगे म्हणतात, की छगन भुजबळ म्हातारे झाले आहेत पण जेवढे माझे केस आहेत तितकी आंदोलन मी केली आहेत. आंदोलनं मला नवी नाहीत, असं भुजबळ म्हणाले. बाळासाहेब सराटे हायकोर्टात गेले आहेत आणि त्यांना इतरांना आरक्षणातून बाहेर काढण्याची मागणी केलीय, असं भुजबळ म्हणाले. विविध मागण्या करुन ओबीसींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ यांनी आज देखील बीडमधील क्षीरसागर कुटुंबियांसोबत घडलेला प्रकार पुन्हा सांगितला. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली, असं भुजबळ म्हणाले. त्यानंतर संदीप क्षीरसागरांचा रोहित पवारांसोबत असल्याचा फोन आला. संध्याकाळी रोहित पवार हे संदीप क्षीरसागर यांना घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे गेले होते, असं भुजबळ यांनी म्हटलं. ज्यांनी तुझं घर जाळलं त्यांच्याकडे संदीप क्षीरसागर कशासाठी गेले, असा सवाल भुजबळ यांनी केला.
बीडमध्ये घरं जळाली, हॉटेल जळाली या घटनेचा निषेध करायला हवा होता पण कोणी गेलं नाही. मी बीडमध्ये गेलो तर आग लावायला गेल्याचा आरोप करण्यात आल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळ यांनी हिंगोलीतील सभेत गायकवाड आयोगातील आकडेवारी वाचून दाखवली. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की जो समाज खुल्या वर्गातून लोकसेवेतून इतक्या जागा पटकावत असेल तर ती अभिमानाची बाब असायला हवी. त्यामुळं आरक्षण देता येणार नाही, असं कोर्टानं म्हटल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
ईडब्ल्यूएस आरक्षण नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. त्याद्वारे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांमध्ये ७८ टक्के मराठा समाजाचे तरुण तरुणी आहेत, असं भुजबळ म्हणाले.