जिला

मागील एक वर्षांपासून आसना पूलाचे भिजत घोंगडे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन; युवक काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

नांदेड, दि. 25 – आश्‍वासनाची खैरात वाटत तब्बल एक वर्षापूर्वी भूमीपूजन केलेल्या आसनापुलाच्या कामाला अद्याप मुहूर्त लागला नाही. गांभीर्याचा विषय म्हणजे आता कुठे भूसंपादनाच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आसनापुलाचे भिजत घोंगडे पडले असून मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केलेल्या पासदगाव येथील आसना पुलाचे बांधकाम तत्काळ सुरु करा अन्यथा रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा ‘नारळ फोडो’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार 14 महिन्यापूर्वी गेले. त्यानंतर राज्यामध्ये ईडी सरकार आले. या ईडी सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांनी येनकेन प्रकारे अनेक खटाटोप करुन प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून पासदगाव येथील आसना नदीवर मंजूर नसलेल्याच पुलाचे भूमीपूजन सप्टेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उरकून घेतले.
आसना पूल होणे हे या भागातील जनतेसाठी अत्यंत गरजेची बाब आहे. आसना नदीस पूर आल्यानंतर पासदगावाहून पुढे जाण्यासाठी रस्ता बंद पडतो. त्यामुळे हा पूल होणार असल्याचा आनंद या भागातील प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वर्षापूर्वी दिसत होता. परंतु या आनंदाचे रुपांतर आता निराशेच्या भावनेत झाले आहे.

या पुलाची तांत्रिक किंवा प्रशासकीय मान्यता मिळण्याआधी पुलासाठी आवश्‍यक असणारे भूसंपादन करण्याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. आता कुठे बारा महिन्यानंतर शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसी मिळाल्या आहेत. यावरुन एक वर्षापूर्वी पुलाचे केलेले भूमीपूजन म्हणजे आ.बालाजी कल्याणकर यांचा पब्लिसिटी स्टंट होता हे आता स्पष्ट झाले आहे.
आ.बालाजी कल्याणकर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार असल्यामुळे त्यांनी आता तरी जनतेला भूलथापा न देता पुलाच्या निर्मिती संदर्भात सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करुन बांधकाम लवकरावत लवकर सुरु करावे अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने पुन्हा एकदा याच पुलावर नारळफोडो आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने विठ्ठल पावडे यांनी दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button