मराठा आरक्षण तापणार! ”जालन्याच्या घटनेत पोलिसांचा दोष नसून…” पवार थेटच बोलले
जालनाः जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राडा झाला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे.
खुद्द शरद पवार यांनी याबाबत माध्यांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, मला जालन्याहून एक दोन लोकांचे फोन आले. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला, शांततेने सगळं चाललं होतं. मात्र चर्चेनंतर पोलिस बळाचा वापर करुन आंदोलकांना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. तेथील तरुणांवर प्रखर लाठीहल्ला केला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. हल्ली विशेषतः सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर बळाचा वापर होतो आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांची अशी सूचना असावी. त्यांच्या मनामधील काही घटकाबद्दलच्या भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आज तेच चित्र जालन्यात झालेलं आहे.
”पोलिसांचा यामध्ये दोष नाही. तसे आदेश त्यांना आले असतील. या घटनेची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारमधील गृह खात्याची जबाबदारी आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही तर त्या ठिकाणी जावून धीर द्यावा लागेल.” अशी प्रतिक्रिया ‘टीव्ही ९’शी बोलताना शरद पवारांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. उपोषणादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करीत आंदोलकांना हुसकावलं. त्यामुळे आणखीच वाट पेटला.