‘इंडिया’च्या बैठकीत अशोक चव्हाण यांना विशेष निमंत्रित
मुंबईत आज झालेल्या ‘इंडिया’च्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून स्वतः काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी व महासचिव के.सी. वेणुगोपाल सहभागी झाले होते. प्रारंभी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा त्यात सहभाग नव्हता. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तातडीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विशेष निमंत्रित म्हणून बैठकीत सहभागी होण्याची सूचना दिली. त्यानुसार चव्हाण लगेच बैठकीच्या दालनात दाखल झाले.
‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे समन्वयक म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा उत्तम समन्वय साधून त्यांनी चोख नियोजन केले. यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या उत्तम नियोजनासाठीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये त्यांची बरीच प्रशंसा झालेली आहे. त्यापाठोपाठ आता ‘इंडिया’च्या बैठकीतही अशोक चव्हाण यांनी जोरदार कामगिरी बजावली.