मराठवाडा
हिंगोली : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असलेला २७० क्विंटल तांदूळ जप्त
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: नागपूर येथे सोयाबीनचे पोते नेण्याचे भाडे असल्याचे सांगून त्यात स्वस्त धान्याचा २७० क्विंटल तांदूळ नेला जात असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांच्या पथकाने २७० क्विंटल तांदूळासह एक ट्रक असा ३० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोघांवर शनिवारी (दि.१) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे.
शहरालगत अकोला बायपास भागातून एका ट्रकमधून स्वस्त धान्याचा तांदूळ नेला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे यावेळी तांदूळ नेण्यासाठी १४ टायर असलेल्या ट्रकचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती होती. त्यावरुन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार तुकाराम आम्ले, मोसीन पठाण, सुमीत टाले, विनोद दळवी यांच्या पथकाने मध्यरात्री एक वाजल्या पासून शहरातील रिसाला रोडवर वाहनांची तपासणी सुरु केली. यामध्ये एक मोठा ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक सुर्यकांत नागनाथ स्वामी (रा. तुळशीराम नगर, तरोडा नाका, नांदेड) याच्याकडे वाहनातील पोल्यांमध्ये काय आहे याची चौकशी केली.
यावेळी त्याने पोत्यामध्ये सोयाबीन असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी काही पोत्यांची तपासणी केली असता त्यात स्वस्त धान्याचा तांदूळ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनी ट्रकमधील सर्व 540 पोत्यांची तपासणी केली असता सर्व पोत्यात तांदूळ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालक सुर्यकांत याची चौकशी केली असता त्याने अकोला बायपास भागातून रौफ़भाई याने नागपूर येथे सोयाबीन नेण्याचे सांगून वाहतुकीसाठी ट्रक बोलावल्याचे सांगितले. पोलिसांनी ५.४० लाखांचा तांदूळ व ट्रक असा ३० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक जिव्हारे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक सुर्यकांत स्वामी (रा. नांदेड), रौफभाई (रा. हिंगोली) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले पुढील तपास करीत आहेत