BRS ची भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक, आतापर्यंत जे केलं नाही ते करणार, केसीआर यांच्या उपस्थितीत पुढचं पाऊल
नागपूर : भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या गुरुवार, १५ जून रोजी शहरात येत आहेत. राज्यातील पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
के. चंद्रशेखर राव यांचे गुरुवारी दुपारी १ वाजता शहरात आगमन झाल्यानंतर साई मंदिराजवळील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होईल. यानंतर दुपारी २ वाजता सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम होईल. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील सभा गाजवणाऱ्या राव यांनी उपराजधानीत मात्र, शक्तिप्रदर्शन टाळले आहे.
‘अबकी बार किसान सरकार’ अशी घोषणा करणाऱ्या राव यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. बीआरएसचे नेते बालका सुमन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या टीमने नागपुरात ठाण मांडले आहे. तसेच, विदर्भातील नेत्यांशी समन्वय साधला आहे.
दस्तुरखुद्द राव हे विदर्भातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या ३-४ महिन्यांपासून विदर्भासह राज्याच्या अन्य भागातील नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. काही नेत्यांना खास हैदराबादला बोलावून त्यांनी चर्चा केली. पक्ष प्रवेशात कोणते नेते बीआरएसचा गुलाबी झेंडा हाती घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.
‘वेगळ्या विदर्भा’च्या भूमिकेकडे लक्ष
तेलंगण राज्याच्या मागणीदरम्यान त्यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले. त्यामुळे या दौऱ्यात ते विदर्भाबाबत काय भूमिका घेतात, याची उत्सुकता विदर्भवाद्यांना आहे. पूर्व विदर्भाचे समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार दीपक आत्राम, राजू तोडसाम, वसंतराव बोंडे, चरण वाघमारे, निखिल देशमुख, जावेद हबीब, संजय बोरकर, मतीन तमन्ना आदींच्या नेतृत्वाखाली पक्षाचे झेंडे, पोस्टर्स, बॅनर्सद्वारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.
दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ताकद वाढवली जात आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या भगिरथ भालके यांनी नुकतीच के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादला जाऊन भेट घेतली होती. त्यासाठी खास विमान पाठवण्यात आलं होतं.