ओडिसा रेल्वे अपघात कसा झाला? 2 ट्रॅक, 3 ट्रेन अन् 5 मिनिटात गेले 288 बळी
भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक अमिताभ शर्मा यांनी एएफपी न्यूज एजन्सीला सांगितलं की, दुर्घनेटत दोन प्रवासी ट्रेन होत्या तर तिसरी मालगाडी होती. ती एका ट्रॅकवर उभा होती.बालासोरमध्ये शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना झाली. चेन्नईला निघालेली कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि एका मालगाडीला धडकली. यानंतर अनेक डबे उलटले.
मालगाडीला धडकल्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस त्या डब्यांना धडकली. सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला.रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बचावमोहिम रात्रभर सुरू होती. यासाठी रेल्वे कर्मचारी, एनडीआरएफ टीम, आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून रेल्वेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
धडक इतकी भीषण होती की रुळांवरून घसरल्यानंतर पहिला डबा हवेत उंच उडाला. एक कोच त्याच्या छतावर जाऊन पडला. तर दोन ट्रेनचे एकूण 17 डबे दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका पाठोपाठ कशी दुर्घटना घडली असा प्रश्न विचारला जातोय. दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्यात कोरोमंडल एक्सप्रेस ही मालगाडी थांबलेल्या ट्रॅकवर कशी गेली. ही तांत्रिक चूक की मानवी चूक ? असं विचारलं जात आहे. एकाच ठिकाणी तीन ट्रेनची दोनदा धडक झाली. अनेकांनी यामध्ये सिग्नल बिघडल्याची शक्यता व्यक्त केलीय.
एका प्रवाशाने सांगितलं की, मी झोपेत होतो आणि ट्रेन रुळावरून घाली घसरल्याच्या आवाजाने जागा झालो. अचानक १० ते १५ लोकांना मृतावस्थेत पाहिलं. मी कसाबसा कोचमधून बाहेर पडलो तर बाजुला फक्त मृतदेहच पाहिले.