मराठवाडा

याच शैक्षणिक वर्षात परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार- केंद्रीय आरोग्य मंत्री

(नजीब सिद्दीकी) 
         
तपासणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नकारात्मक अहवाल दिल्याने येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सर्व वस्तुस्थिती विशद करून याच शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी व हे महाविद्यालय याच वर्षापासून सुरू व्हावे या प्रमुख मागणीसाठी परभणीचे खासदार संजय जाधव, राज्यसभा सदस्य श्रीमती फौजिया खान यांनी आज बुधवारी (दि. 10) केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून याच शैक्षणिक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल असे खासदार संजय जाधव व खासदार श्रीमती फौजीया खान यांनी सांगितले.
        शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात येथे गेल्या आठवड्यापासून हालचाली गतिमान झाल्या आहेत. विशेषतः तपासणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने नकारात्मक अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्य यंत्रणेवर कठोर टीका केली. संबंधित समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता व संबंधित अधिकाऱ्यांनी गलथानपणा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली होती. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी येथील शासकीय रुग्णालयात दिवसभर तळ ठोकून वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील सर्व अडचणी व त्रुटींचा आढावा घेतला. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील सर्व हालचालींना पुन्हा वेग आला. दरम्यान आज बुधवारी आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी आरोग्य खात्याच्या सचिवांशी चर्चा केली. तर खासदार संजय जाधव, खासदार श्रीमती फौजीया खान यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी आज यासंदर्भात चर्चा केली. संबंधित तपासणी पथकाने आपला अहवाल प्रतिकूल दिला असला तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीला व्हावे यासंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. ज्या त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दूर करून समिती जेव्हा दुसऱ्यांदा तपासणीसाठी येईल तेव्हा सर्व त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या शैक्षणिक वर्षापासून परभणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल व प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू होईल असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार संजय जाधव व खासदार श्रीमती फौजिया खान यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button