जिला
तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द -अपर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर
नांदेड दि. 27 :- दैनंदिन आयुष्यात वावरताना सर्वांनी तृतीयपंथी यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी सांगितले. समता पर्वनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक समता पर्वानिमित्त 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्यासाठी ओळखपत्र वाटप व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकर, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी, कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमर गोधने, तृतीयपंथीयांचे गुरु फरीदा बकस आदीची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्ती जनजागृती शिबिर व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तृतीयपंथीयांना समाजात प्रतिष्ठा मिळावी व त्यांना समाजाने मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे म्हणून शासन प्रयत्नशिल असून नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथी यांच्यासाठी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांनी स्पष्ट केले.