महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
सातारा : देशात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची वाढता आकडेवारी धडकी भरवणारी आहे
सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
दोघा रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाला आहेत. गर्दीची ठिकाणे जाणे टाळावे. मास्कचा वापर करणे तसेच काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
पुण्यात महिलेचा मृत्यू
पुण्यातही कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. पुणे मनपा हद्दीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 75 ते 80 या वयोगटातही ही महिला रूग्ण होती. 24 तासांत पुणे जिल्ह्यात ९३ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर, पुणे शहरात 39 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. पुणे मनपा आरोग्य यंत्रणा या रूग्णवाढीमुळे सतर्क झाली आहे. सोलापुरात एकाच दिवसात दहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या सोलापूर शहरात 69 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनामुळे एकू तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 562 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 395 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतली जात आहे.
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ
पुन्हा एकदा देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. देशात एकाच दिवसात 3 हजार 641 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोरोना रुग्ण वेगानं वाढ होत आहे. सध्या देशात 20219 सक्रिय रुग्ण आहेत.